(शिफा मुल्ला ह्या लहान मुली समवेत माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण केला).
इंदापूर :- सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते, शैक्षणिक क्रांतीचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष मा. रत्नाकर मखरे तात्या व संचालिका सौ. शकुंतला मखरे (काकी) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी म्हणून उपस्थित कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून सामाजिक व शारीरिक अंतर पाळून जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला.
माजी नगराध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मा. रत्नाकर मखरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी माहिती सांगताना म्हणाले की, काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अंमलात आणली.
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे हे आपण अनेक नेत्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकत असतो आणि पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला कि एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण बहुजन बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला पण त्यांनी ह्या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले. आज मागास, दलित, बहुजनांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारली ह्याचे मुख्य कारण छत्रपती शाहू महाराजांचे कठोर प्रयत्न, त्यांनी आखलेल्या योजना आणि त्या पूर्णत्वास नेल्या.
रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी ह्यातच शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य यामुळे बहुजनांच्या मनात त्यांना मिळालेले मानाचे स्थान याची कल्पना येते. आजपर्यंत भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण असे की, त्यांनी बहुजनांची केवळ सामाजिक परिस्थिती सुधारण्याकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची प्रत्यक्ष तरतूद केली.
शिक्षणानंतर बहुजन वर्गाच्या रोजगाराचीही सोय व्हावी तो आर्थिक दृष्ट्यासुद्धा सक्षम व्हावा यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली व म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. १८९४ साली जेंव्हा त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतला तेंव्हाच त्यांनी बहुजन व मागासवर्गीयांच्या उन्नतीचे उद्दिष्ट ठरवले व आपल्या दूरदर्शी योजनांद्वारे ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेले.
मानसिक गुलामी दूर करायची असेल तर सर्वप्रथम अज्ञान दूर व्हायला हवे हे शाहू महाराजांनी अचूक ओळखले. हे अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गुलामीचे जोखड झुगारून देण्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे शिक्षण. त्यासाठी महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांनी असा आदेशच जारी केला कि सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण घ्यावेच लागेल अन्यथा दंड ठोठावण्यात येईल. शाहू महाराज केवळ आदेश देऊन स्वस्थ बसले नाही तर आपल्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याची संपूर्ण माहिती नियमितपणे त्यांना मिळावी अशीही व्यवस्था त्यांनी केली होती. यातून त्यांची सर्वसामान्य रयतेप्रती असलेली तळमळ दिसून येते व छत्रपती शाहू महाराजांना लोक रयतेचा राजा का म्हणत हे सुद्धा समजून येते. असे मखरे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव अॅड. समीर मखरे , सामाजिक कार्यकर्ते गोरख तिकोटे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा